पीएमपीएमएलच्या प्रवासी दिनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संचालक अजय खेडेकर यांनी थेट साधला प्रवाशांशी संवाद; तक्रारींचे अर्ज स्वीकारले
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पीएमपीएमएलच्या प्रवासी दिनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे | दि. ११ सप्टेंबर २०२६ :
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) च्या वतीने आज प्रवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. महेश आव्हाड, भा.प्र.से. यांच्या संकल्पनेतून प्रवाशांच्या समस्या, सूचना व तक्रारी थेट जाणून घेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी प्रवासी दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्याच अनुषंगाने आज मनपा भवन मुख्य बसस्थानक येथे पीएमपीएमएलचे संचालक मा. अजय खेडेकर यांनी सायंकाळी ५.०० ते ७.३० वाजेपर्यंत प्रवाशांशी थेट संवाद साधला.
यावेळी त्यांनी नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारी जाणून घेतल्या तसेच प्रवाशांकडून लेखी तक्रारी व अर्ज स्वीकारले. प्रवाशांनी बससेवा, वेळापत्रक, मार्ग, बसथांबे, वाहतूक व्यवस्था तसेच प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांबाबत आपल्या सूचना व समस्या मांडल्या.
या वेळी आगारप्रमुख श्री. मदगे, जनसंपर्क अधिकारी नागेश गायकवाड तसेच संबंधित आगारातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रवाशांच्या समस्या थेट ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रवासी दिनाचा उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तक्रारी व सूचनांना प्राधान्य देऊन त्यावर आवश्यक कार्यवाही करण्याच्या तसेच प्रवासी दिनाचा सातत्याने आणि प्रभावीपणे अंमल करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
पीएमपीएमएलच्या सर्व आगारांमध्येही प्रवासी दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला. विविध आगारांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, सूचना व तक्रारी जाणून घेतल्या तसेच प्रवाशांकडून लेखी अर्ज व तक्रारी स्वीकारण्यात आल्या.
पीएमपीएमएलच्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या समस्या व सूचना मांडल्या. प्रवासी हा सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा केंद्रबिंदू असून, प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ, विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी पीएमपीएमएल सातत्याने प्रयत्नशील आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





