पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हलगी वाजवून आंदोलन; कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर कारवाईची मागणी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हलगी वाजवून आंदोलन; कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर कारवाईची मागणी
पुणे : पुणे महानगरपालिका तसेच १५ क्षेत्रीय कार्यालयांमधील स्वच्छता व साफसफाईच्या कामासाठी देण्यात आलेल्या कंत्राटांमध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन, ईएसआय, ईपीएफ तसेच इतर आवश्यक सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत १५ ऑगस्ट रोजी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हलगी वाजवून आंदोलन करण्यात आले.
सकाळी ७ ते ९ या वेळेत शिवाजीनगर येथील पुणे महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते तुकाराम अर्जुन लांडगे, सामाजिक कार्यकर्ते अनिल गवळे आणि सुरज पाटोळे यांच्यासह मित्र परिवार उपस्थित होता.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित, हडपसर तसेच एलव्हीजी फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड, हडपसर या कंत्राटदारांकडून कंत्राटी कामगारांच्या हक्कांबाबत नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप आहे. तसेच कामाचा अनुभव दाखला कथितरीत्या गैरवापरून टेंडर मिळविल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
या प्रकरणी संबंधितांकडे यापूर्वी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला असल्याचे आंदोलकांनी सांगितले. संबंधित कंत्राटदारांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पुणे महानगरपालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी या प्रकरणी टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. कंत्राटी कामगारांना त्यांचे कायदेशीर हक्क आणि शासनाने निश्चित केलेल्या सुविधा मिळाव्यात, तसेच टेंडर प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, संबंधित कंत्राटदार आणि पुणे महानगरपालिका प्रशासनाची या आरोपांवरील अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





