सराईत गुन्हेगारास एक वर्षासाठी स्थानबद्ध; लोणीकाळभोर पोलिसांची एमपीडीए अंतर्गत कारवाई
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
सराईत गुन्हेगारास एक वर्षासाठी स्थानबद्ध; लोणीकाळभोर पोलिसांची एमपीडीए अंतर्गत कारवाई
लोणीकाळभोर : परिसरात दहशत निर्माण करून शरीर व मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार राज रविंद्र पवार (वय २८, रा. गुजरवस्ती, कवडीपाट टोलनाका, ता. हवेली, जि. पुणे) याच्यावर लोणीकाळभोर पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, धोकादायक व्यक्ती व इतर तत्सम व्यक्तींच्या धोकादायक कारवायांपासून समाजाचे संरक्षण करण्यासंबंधीच्या एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करत त्यास एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. त्याची अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कठोर व प्रभावी कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस अभिलेखावरील टोळी गुन्हेगार, शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे तसेच जनतेमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
राज पवार याच्याविरुद्ध लोणीकाळभोर व हडपसर पोलीस ठाण्यांत एकूण १४ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये बदल झाला नसल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वीही ३ सप्टेंबर २०२४ रोजी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची कोल्हापूर कारागृहात रवानगी करण्यात आली होती.
त्यानंतरही तो पुन्हा लोणीकाळभोर परिसरात येऊन खुनाचा प्रयत्न, धोकादायक शस्त्राने दुखापत करणे, इतरांच्या जीवितास व वैयक्तिक सुरक्षिततेस धोका निर्माण करणे, गंभीर स्वरूपाच्या धमक्या देणे, मृत्यूची भीती दाखवून खंडणी उकळणे तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्याच्या या सातत्यपूर्ण गुन्हेगारी कारवायांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊन नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याने त्यास धोकादायक व्यक्ती ठरवत लोणीकाळभोर पोलीस ठाण्याने पुन्हा एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली. त्यास एक वर्षाच्या कालावधीसाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त जीवन बेनिवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार विलास शिंदे, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, महिला पोलीस अंमलदार योगिता भोसुरे, तसेच पोलीस अंमलदार चेतन कुंभार, अमोल जाधव आणि गणेश शिंदे यांनी सहभाग घेतला.
सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लोणीकाळभोर पोलिसांकडून विशेष मोहीम सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





