नवरात्रोत्सवात देवींच्या शक्तिस्थळांच्या दर्शनासाठी पीएमपीएमएलची ‘पर्यटन बस’ सेवा
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
नवरात्रोत्सवात देवींच्या शक्तिस्थळांच्या दर्शनासाठी पीएमपीएमएलची ‘पर्यटन बस’ सेवा
किफायतशीर दरात वातानुकूलित स्मार्ट ई-बसमधून धार्मिक व पर्यटनस्थळांना भेटीची सुविधा
पुणे : नवरात्रोत्सवानिमित्त देवींच्या विविध शक्तिस्थळांसह धार्मिक व पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या भाविक आणि पर्यटकांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) कडून विशेष ‘पर्यटन बससेवा’ उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीएमपीएमएलच्या एकूण १३ पर्यटन बससेवांचा लाभ पर्यटकांना घेता येणार असून, प्रति प्रवासी ५०० रुपये इतका किफायतशीर दर निश्चित करण्यात आला आहे.
पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या या पर्यटन बससेवेतून प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे. संपूर्ण वातानुकूलित स्मार्ट इलेक्ट्रिक बसमधून धार्मिक व पर्यटनस्थळांना भेट देता येणार असल्याने पर्यटक, भाविक-भक्त तसेच नागरिकांकडून या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ही पर्यटन बससेवा उपलब्ध राहणार असून, इतर दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसारही बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
देवींच्या शक्तिस्थळांसाठी विशेष मार्ग
नवरात्रोत्सवानिमित्त पर्यटन बससेवा क्र. १३ (१) अंतर्गत पुणे स्टेशन येथून सकाळी ८.३० वाजता बस सुटणार आहे. या मार्गात माता मंदिर कोंढणपूर, तळजाई माता मंदिर, पद्मावती मंदिर, तुकाई मंदिर, श्रीनाथ म्हस्कोबा-जोगेश्वरी माता मंदिर, शिवरी, यमाई माता मंदिर कोडीत आदी धार्मिक स्थळांचा समावेश आहे. बस सायंकाळी ७ वाजता पुणे स्टेशन येथे परत येणार असून, प्रति प्रवासी तिकीट दर ५०० रुपये आहे.
पर्यटन बससेवा क्र. १३ (२) मध्ये महालक्ष्मी मंदिर, सारसबाग, तांबडी जोगेश्वरी मंदिर, चतु:शृंगी माता मंदिर, वैष्णवी माता मंदिर, भवानी माता मंदिर आदी धार्मिक स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. ही बसदेखील सकाळी ८.३० वाजता पुणे स्टेशन येथून सुटून सायंकाळी ७ वाजता पुणे स्टेशन येथे परत येणार आहे.
धायरेश्वर मंदिर, जाधव वाडा आणि पांडवकालीन शिवमंदिराचाही समावेश
पर्यटक व भाविकांच्या मागणीनुसार पर्यटन बससेवा क्र. ५ मध्ये धायरी गावातील धायरेश्वर मंदिर तसेच नांदेड गावातील जाधव वाडा ऐतिहासिक संग्रहालय या स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पर्यटन बससेवा क्र. १२ मध्ये पांडेश्वर-नाझरे रोडवरील श्रीक्षेत्र पांडेश्वर येथील पांडवकालीन शिवमंदिराचा समावेश करण्यात आला आहे.
आठ प्रमुख केंद्रांवरून बुकिंगची सुविधा
पर्यटन बससेवेचे बुकिंग पीएमपीएमएलच्या डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर गाडीतळ, पुणे मनपा भवन, भोसरी बसस्थानक आणि निगडी येथील पास केंद्रांवरून करता येणार आहे.
पर्यटन बससेवेचे तिकीट बुकिंग तसेच पर्यटनस्थळांसंदर्भातील अधिक माहितीसाठी पीएमपीएमएलचे समन्वयक सेवक नितीन गुरव (मो. ९८५०५०१८६२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविक, पर्यटक आणि निसर्गप्रेमींनी पीएमपीएमएलच्या किफायतशीर पर्यटन बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





