करंदी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासकामांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
करंदी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासकामांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाहणी
पुणे जिल्ह्यातील ‘मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र’ उपक्रमाला गती
करंदी (ता. शिरूर) : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी शिरूर तालुक्यातील करंदी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी आरोग्य केंद्रातील विविध सुविधा तसेच सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला.
पुणे जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम, दर्जेदार आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने ‘पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत करंदी प्राथमिक आरोग्य केंद्राचाही समावेश करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांची श्री. गजानन पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधा, रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सेवा तसेच आवश्यक सुधारणा याबाबत त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली.
आरोग्य केंद्राच्या विकासकामांचा दर्जा आणि कामांची गती याबाबत आवश्यक सूचना देत, नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश श्री. गजानन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
‘पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र’ उपक्रमामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होऊन नागरिकांना त्यांच्या परिसरातच गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





