आषाढी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र थेऊर येथे भाविकांची अलोट गर्दी; श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
आषाढी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र थेऊर येथे भाविकांची अलोट गर्दी; श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा
थेऊर, दि. २ ऑगस्ट : आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी गणपती मंदिरात रविवारी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी श्री चिंतामणीचे दर्शन घेत संकष्टीचा पवित्र दिवस भक्तिभावाने साजरा केला.
पहाटे मंदिराचे पुजारी कीर्तिराज आगलावे यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा संपन्न झाली. त्यानंतर चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देवस्थानच्या वतीने मंदिर परिसर व मंदिराबाहेर मांडव उभारण्यात आला होता. तसेच दर्शनबारी, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. दुपारी देवस्थानच्या वतीने भाविकांना उपवासाची खिचडी प्रसाद म्हणून वाटण्यात आली.
सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळाच्या साथीने ह.भ.प. कल्याणजी महाराज (जालना) यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले. चंद्रोदयानंतर श्री चिंतामणीचा पारंपरिक छबिना मोठ्या भक्तिमय वातावरणात काढण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दिवसभर भाविकांची मोठी गर्दी असल्याने देवस्थानच्या वतीने अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने वाहनधारकांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापनावर देवस्थानचे विश्वस्त केशव उमेश विद्वांस यांनी स्वतः लक्ष ठेवून सर्व व्यवस्था सुरळीत पार पडतील याची दक्षता घेतली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





