कौशल्याधारित शिक्षण व एआयची जोड दिल्यासच लोहार समाजाचा विकास शक्य – संतोष हराळे
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
कौशल्याधारित शिक्षण व एआयची जोड दिल्यासच लोहार समाजाचा विकास शक्य – संतोष हराळे
आळंदी (प्रतिनिधी): लोहार समाजातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित अभ्यासक्रम, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड उच्च शिक्षणाला दिल्यासच समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. तसेच अन्न, वस्त्र आणि आरोग्याशी संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी अधिक असल्याने तरुणांनी त्या दिशेने प्रयत्न वाढवावेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या ओबीसी विभागाचे सहसंचालक संतोष हराळे यांनी केले.
रविवारी (दि. २६) श्रीक्षेत्र आळंदी येथील विश्वकर्मा गाडी लोहार समाज विकास धर्मशाळेत लोहार शिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य (पुणे विभाग) आणि अखिल महाराष्ट्र गाडी लोहार समाज विकास महासंघ, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेचे अधिकारी नितीन सहारे, जिल्हा उद्योग केंद्राचे माजी उद्योग निरीक्षक ईश्वर लोहार, महासंघाचे उपाध्यक्ष किसनराव बलांन्से, शिक्षण परिषदेचे अध्यक्ष सुभाष कौसे, उपाध्यक्ष प्रा. संजयकुमार कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक विजयराव रुम, उद्योजक संजीव दाते, सचिव सुनील चव्हाण, उपसचिव बाळासाहेब पोपळघट, गजानन चव्हाण, ज्ञानेश्वर थोरात, प्रा. दिगंबर थोरात, राजेंद्र चव्हाण यांच्यासह समाजबांधव, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना संतोष हराळे म्हणाले की, औद्योगिक तंत्रज्ञानामुळे पारंपरिक लोहारी व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून रोजगाराचे नवीन पर्याय स्वीकारणे ही काळाची गरज आहे. बदलत्या परिस्थितीत शिक्षणाशिवाय पर्याय नसून विद्यार्थ्यांनी एआय, आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमांची निवड केल्यास भविष्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.
बार्टीचे अधिकारी नितीन सहारे यांनी विद्यार्थ्यांना महाज्योती योजनेसह शासनाच्या विविध शैक्षणिक योजना, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण तसेच परदेशात उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळांवर जाऊन विविध योजनांचा अभ्यास करून त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ईश्वर लोहार यांनी लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांसाठी आवश्यक असलेले भागभांडवल, शासकीय कर्ज योजना आणि उद्योग उभारणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रश्नमंजुषा, निबंध लेखन व बोधलेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या ३५ विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तके आणि ₹२,५००, ₹१,०००, ₹७५० व ₹५०० अशा एकूण ₹३० हजारांच्या रोख बक्षिसांनी गौरव करण्यात आला.
याशिवाय शिक्षण परिषदेच्या पुणे व पिंपरी-चिंचवड येथील सदस्यांनी स्वखर्चातून समाजातील नऊ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर आणि एक डझन फुलस्केप वह्यांचे वाटप केले. मार्च २०२६ मधील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या १४ गुणवंत विद्यार्थ्यांचाही पुस्तक, प्रमाणपत्र व फोल्डर देऊन सत्कार करण्यात आला.
गेल्या चार वर्षांपासून शिक्षण परिषदेच्या सदस्यांकडून समाजातील सुमारे ३० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, शूज, पुस्तके, वह्या, गाईड आणि इतर शैक्षणिक साहित्य त्यांच्या घरी जाऊन देण्याचा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी नंदूरबार, बीड, अहिल्यानगर, संभाजीनगर, धाराशीव, सोलापूर, मुंबई आणि पुणे जिल्ह्यांतून विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण परिषदेचे अध्यक्ष सुभाष कौसे यांनी दिली.
कार्यक्रमात उद्योजक लक्ष्मण पखाले यांनी समाजातील पाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याची घोषणा केली. तसेच प्रत्येकी ₹२,००० प्रमाणे पाच विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रा. संजयकुमार कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विश्वास रुम यांनी केले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





