मांजरी खुर्द – कोलवडी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आंदोलनाचा इशारा
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
मांजरी खुर्द – कोलवडी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात आंदोलनाचा इशारा
पुणे, प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील MDR-34 मांजरी खुर्द ते कोलवडी या रस्त्याच्या अत्यंत दुरवस्थेमुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि भाविक त्रस्त झाले असून रस्त्याच्या रखडलेल्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पंचायत समिती हवेलीच्या सदस्या सौ. सुषमा संतोष मुकुंडे यांनी प्रशासनाला याबाबत पूर्वसूचना पत्र दिले आहे.
मांजरी खुर्द ते कोलवडी या रस्त्यावरील कि.मी. 4/500 ते 9/000 हा भाग गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि धुळीमुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा मार्ग श्री क्षेत्र चिंतामणी, थेऊर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राकडे जाणारा मुख्य मार्ग असून पुणे शहरातील हडपसर, खराडी, मुंढवा या भागांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.
पत्रानुसार, या रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी शासनाने मंजुरी दिली होती. मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून भूसंपादन विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्यात समन्वयाअभावी प्रक्रिया रखडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत :
MDR-34 रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेला 15 दिवसांत अंतिम स्वरूप द्यावे.
भूमी अभिलेख विभागाने तात्काळ मोजणी पूर्ण करून कागदपत्रे PWD कडे वर्ग करावीत.
भूसंपादन पूर्ण होताच रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे.
१ जून २०२६ पर्यंत लेखी आश्वासन व ठोस कार्यवाही न झाल्यास मांजरी खुर्द फाटा येथे “रस्ता रोको” आणि “बेमुदत ठिय्या आंदोलन” करण्यात येईल, असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे. आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





