पूर्व हवेलीतील १४ गावांच्या कचरा व्यवस्थापनासाठी पीएमआरडीएचा १५० टीपीडी प्रकल्प थेऊर येथील १० एकर जागेवर उभारणार कचरा प्रक्रिया केंद्र; पुढील ३० वर्षांचे नियोजन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
पूर्व हवेलीतील १४ गावांच्या कचरा व्यवस्थापनासाठी पीएमआरडीएचा १५० टीपीडी प्रकल्प
थेऊर येथील १० एकर जागेवर उभारणार कचरा प्रक्रिया केंद्र; पुढील ३० वर्षांचे नियोजन
पुणे : पूर्व हवेलीतील वाढती लोकसंख्या आणि कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. थेऊर येथील पीएमआरडीएच्या १० एकर गायरान जागेवर तब्बल १५० टन प्रतिदिन (टीपीडी) क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पूर्व हवेलीतील १४ गावांच्या कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
या संदर्भात दि. १० ऑक्टोबर रोजी पीएमआरडीए मुख्यालय, आकुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) रिनाज पठाण, कार्यकारी अभियंता अनिता कुलकर्णी, उपअभियंता रितेश मुंढे, उपअभियंता अरविंद सिद्राल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, हवेलीचे गट विकास अधिकारी शेखर शेलार यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, प्रशासक व विस्तार अधिकारी उपस्थित होते.
१० एकर जागेवर उभारला जाणार प्रकल्प
थेऊर येथील पीएमआरडीएच्या १० एकर गायरान जागेवर हा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सन २०४३ पर्यंतच्या संभाव्य लोकसंख्येचा विचार करून दररोज १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता या प्रकल्पाची ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी अनेक वर्षांसाठी पूर्व हवेलीच्या कचरा व्यवस्थापनाचा आराखडा तयार होणार आहे.
या १४ गावांना मिळणार दिलासा
या प्रकल्पाचा लाभ थेऊर, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, केसनंद, वाडेबोल्हाई, उरुळी कांचन, साष्टे, कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, आळंदी म्हातोबाची, नायगाव प्रयागधाम, शिंदवणे, पेठ आणि कोळवडी या गावांना होणार आहे.
प्रकल्पस्थळापासून सुमारे २० किलोमीटर परिसरातील ग्रामपंचायतींनी कचरा संकलित करून संबंधित प्रक्रिया केंद्रावर आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना ‘टिपिंग फी’ भरावी लागणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या ग्रामपंचायतींना घंटागाड्यांसाठी प्रयत्न
कचरा संकलनासाठी आवश्यक घंटागाड्या उपलब्ध नसलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून घंटागाड्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी बैठकीत दिली.
पुढील ३० वर्षांच्या कचरा व्यवस्थापनाचे नियोजन
चाकण एमआयडीसी परिसरातील कचरा व्यवस्थापनाच्या नियोजनानंतर आता पूर्व हवेलीतील पुढील ३० वर्षांचा कचरा व्यवस्थापन आराखडा पीएमआरडीएच्या माध्यमातून निश्चित करण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. त्यामुळे वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर कचरा संकलन, वाहतूक आणि प्रक्रिया यासाठी एकात्मिक व्यवस्था उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पूर्व हवेलीच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असून, प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेत आणि प्रभावीपणे होणे आवश्यक असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





