अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर भाविकांसाठी बंद; जतन-संवर्धनासाठी निर्णय
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर भाविकांसाठी बंद; जतन-संवर्धनासाठी निर्णय
पुणे, दि. ८ मे २०२६ : अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन, संवर्धन व दुरुस्तीच्या कामांसाठी श्री क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर आणि श्री क्षेत्र सिद्धटेक येथील गणेश मंदिरे दिनांक १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने अष्टविनायक मंदिरांच्या जतन आणि संवर्धनासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला असून, त्याबद्दल चिंचवड देवस्थान ट्रस्टने शासनाचे आभार मानले आहेत. सध्या श्री मयुरेश्वर मंदिर, मोरगाव, श्री चिंतामणी मंदिर, थेऊर आणि श्री सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेक येथे मुख्य मंदिर तसेच परिसरातील दुरुस्ती आणि संवर्धनाची कामे सुरू आहेत.
पुरातत्त्व विभागाच्या मते, मंदिरांच्या गाभाऱ्याचा व सभामंडपाचा पौराणिक स्वरूपात दगडी बांधकामाद्वारे जतन करण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, कामादरम्यान भाविकांची मोठी गर्दी आणि सततचा वावर यामुळे कामाच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संदर्भात पुरातत्त्व विभागाने सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांच्याकडे विनंती अर्ज सादर केला होता. मंदिर प्रशासन, पुजारी, ग्रामस्थ आणि संबंधित घटकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सह धर्मादाय आयुक्तांनी ७ मे २०२६ रोजी तीनही मंदिरे महिनाभर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळानेही संबंधित ठराव मंजूर केला आहे.
दरम्यान, ८ मे रोजी मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथे ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार असून, मंदिर बंद ठेवण्याच्या निर्णयाची माहिती ग्रामस्थांना देण्यात येणार आहे.
महत्वाच्या सूचना :
मंदिरे दर्शनासाठी बंद असली तरी नित्य पूजा, धार्मिक विधी आणि पूजाअर्चा नियमित सुरू राहतील.
या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष दर्शन किंवा मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
केवळ पुजारी, अधिकृत अधिकारी, कर्मचारी, बांधकाम यंत्रणा आणि विश्वस्त मंडळालाच प्रवेश असेल.
ही विकासकामे मंदिरांची दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्री. मंदार महाराज देव यांनी सांगितले. तसेच भाविकांनी, ग्रामस्थांनी आणि सर्व संबंधितांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space
आणखी कथा





