उत्तमनगर पोलिसांची मोठी कारवाई : पुण्यातील मेफेड्रॉन (एम.डी.) रॅकेटचा पर्दाफाश
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
उत्तमनगर पोलिसांची मोठी कारवाई : पुण्यातील मेफेड्रॉन (एम.डी.) रॅकेटचा पर्दाफाश
पुणे : उत्तमनगर पोलीस ठाण्याने पुणे शहरात कार्यरत असलेल्या अंमली पदार्थांच्या मेफेड्रॉन (एम.डी.) रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आतापर्यंत ८ आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना ८ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्र. ८९/२०२५ (भारतीय न्याय संहिता कलम १३७ (२) – अपहरण प्रकरण) मधील पाहिजे आरोपी सुनिल गोपाळ राठोड हा सिंहगड सृष्टी परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील व त्यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याची अंगझडती घेण्यात आली असता त्याच्याकडून ३ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) व दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. पुढील चौकशीसाठी त्याला उत्तमनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मोबाईल तपासणीदरम्यान आरोपीच्या फोनवरून फोनपे व गुगलपेच्या माध्यमातून सुमारे १० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले.
चौकशीदरम्यान आरोपीने मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ शुभम संतोष दहिभाते, राजन गोपाल नायर, जतीन जयंवत कदम व इतर आरोपींकडून खरेदी करून मागणीनुसार विक्री करत असल्याची कबुली दिली. तपासात २५० ते ३०० लोकांकडून पैशांचे व्यवहार झाल्याचेही समोर आले. या आरोपींवर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्हे नोंद असल्याचेही उघड झाले आहे.
या प्रकरणात संघटित पद्धतीने अंमली पदार्थांचे रॅकेट चालवले जात असल्याचे निष्पन्न झाल्याने एनडीपीएस कायदा कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान उत्तमनगर पोलिसांनी शुभम संतोष दहिभाते याला अटक करून त्याच्या घराची झडती घेतली असता ५.१९ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आले. तसेच पुणे शहर गुन्हे शाखेने राजन गोपाल नायर (उत्तमनगर) व जतीन जयंवत कदम (वारजे) या दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी उत्तमनगर पोलिसांकडे सुपूर्द केले.
या कारवाईत आतापर्यंत एकूण ८.१९ ग्रॅम मेफेड्रॉन, मोबाईल फोन व वाहने असा सुमारे २,३६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे, अक्षय पाटील, मुकेश कुरेवाड, पोलीस हवालदार प्रदीप शेलार, पृथ्वीराज गायकवाड तसेच पोलीस शिपाई चेतन बराटे, परमेश्वर पाडळे, ज्ञानेश्वर तोडकर आणि अनिरुद्ध गायकवाड यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





