कोंढवा येथील थ्री ज्वेल्स अपार्टमेंटमध्ये 400 KW सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
कोंढवा येथील थ्री ज्वेल्स अपार्टमेंटमध्ये 400 KW सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
पुणे, कोंढवा – पर्यावरण संरक्षण आणि ऊर्जा बचतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत कोंढवा येथील थ्री ज्वेल्स अपार्टमेंट या गृहनिर्माण संकुलात 400 KW क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन दिनांक 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मा. योगेश आण्णा टिळेकर,आमदार विधानपरिषद महाराष्ट्र यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.या प्रसंगी प्रभाग क्रमांक 40 च्या नगरसेविका- श्रीमती रंजना टिळेकर,सौ.अर्चना जगताप, सौ. वृषाली कामठे व सौ. पूजा कदम तसेच या भागातील तरुण कार्यकर्ते श्री राहुलअप्पा टिळेकर, श्री तुषार कदम,श्री श्रीकांत कामठे, श्री उमेश दांडेकर हे सर्वजण आवर्जून उपस्थित होते.
सुमारे 1600 सदनिका असलेल्या कोंढवा भागातील या सर्वात मोठ्या निवासी संकुलात उभारण्यात आलेला हा सौर ऊर्जा प्रकल्प कदाचित पुणे जिल्ह्यातील निवासी संकुलातला सर्वात मोठा प्रकल्प आहे आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीसाठी एक आदर्श उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे अपार्टमेंटच्या सामायिक वीज वापराचा मोठा भाग सौर ऊर्जेतून भागवता येणार असून वीज खर्चात लक्षणीय बचत होणार आहे. तसेच कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे.
या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी सेक्रेटरी पांडुरंग भोले यांनी प्रास्ताविक करताना या सोलर प्रकल्पाच्या प्रवासाबद्दल माहिती दिली.सोसायटीचे अध्यक्ष सूर्यकांत खुरसे यांनी सोलर प्रोजेक्ट राबवण्यामागील भूमिका मांडली व या कामी अपार्टमेंट्सच्या सर्व सभासदांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.या प्रकल्पासाठी अंदाजे 2.25 कोटी खर्च झाले.सरकारी धोरणाप्रमाणे साधारणपणे 68 लाख रुपयांची सबसिडी अपेक्षित आहे, तर होणाऱ्या विजनिर्मितीमुळे अंदाजे वार्षिक एक कोटी रुपयांची वीज बील बचत होईल.त्यांनी पुढे सांगितले की,भविष्यात ऊर्जा बचत, पाणी संवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचा असोसिएशनचा मानस आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे रहिवाशांमध्ये हरित ऊर्जेबाबत जागरूकता वाढण्यासही मदत होणार आहे. एवढ्या मोठ्या क्षमतेचा सोलर प्रोजेक्ट आकाराला आणतानाची तांत्रिक आव्हाने, प्रत्यक्ष कामात आलेल्या अडचणी आणि सोलर कमिटीने त्यावर केलेली मात याबद्दल श्री संजय मुळे यांनी सविस्तर तांत्रिक माहीती दिली.श्री रुपेश शहा यांनी आलेल्या स्ट्रुक्चरल आव्हानांबद्दल माहिती दिली.
आमदार योगेश आण्णा टिळेकर यांनी सौर ऊर्जेच्या वाढत्या महत्त्वावर प्रकाश टाकत अशा उपक्रमांमुळे शाश्वत विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले.सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्याचे सध्याच्या भाजप सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले. टिळेकर नगरमधील थ्री ज्वेल्सच्या सभासदांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल अपार्टमेंटचे सर्व पदाधिकारी, सोलर कमिटीचे सदस्य, तांत्रिक तसेच स्ट्रक्चरल सल्लागार तसेच प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल नेचर लाईट कंपनीचे सर्व भागीदार, तंत्रज्ञ, कर्मचारी या सर्वांचे अभिनंदन केले.
शेवटी संस्थेचे उपाध्यक्ष प्रल्हाद दुधाळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कोंढवा परिसरातील मोठ्या गृहनिर्माण संकुलांपैकी एक असलेल्या थ्री ज्वेल्स अपार्टमेंटने सौर ऊर्जा वापराचा घेतलेला हा पुढाकार इतर सोसायट्यांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





