लोककला महोत्सव 2026 मध्ये संगीतकार शिवराज साने यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
लोककला महोत्सव 2026 मध्ये संगीतकार शिवराज साने यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान 
मुंबई, दि. २७ ऑगस्ट : लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करणारे गायक, कवी व संगीतकार शिवराज साने यांचा लोककलावंत सांस्कृतिक मंच, मुंबई आयोजित ‘लोककला महोत्सव 2026’ मध्ये प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
गेल्या तब्बल २५ वर्षांपासून शिवराज साने हे लोककलेच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये जनजागृतीचे कार्य करीत आहेत. महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासोबतच अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण संरक्षण, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि जातीय सलोखा यांसारख्या विविध सामाजिक विषयांवर गीतगायनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.
मुंबईतील प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित या लोककला महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा. रामदास आठवले, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा. ॲड. आशिष शेलार, सामाजिक न्याय मंत्री मा. संजय शिरसाट, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मा. भीमराव आंबेडकर, सुप्रसिद्ध गायक मा. आनंद शिंदे, ज्येष्ठ विचारवंत व कार्यक्रमाध्यक्ष डॉ. प्रा. बी. के. डोंगरगावकर, दंगलकार प्रसिद्ध कवी मा. चंदनशिवे, प्रसिद्ध गायक-संगीतकार मा. विश्वजीत शिंदे, प्रसिद्ध गायक मा. राहुल शिंदे तसेच प्रसिद्ध पोवाडा गायक मा. राजा कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मा. विष्णू शिंदे लिखित ‘त्रिरत्न’, ‘नील नयनी’ आणि ‘बहुरंग’ या तीन नवीन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. तसेच महापुरुषांच्या विचारांवर आधारित गीतगायनाचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मा. हर्षद कांबळे यांनी केले. या लोककला महोत्सवाचे प्रमुख आयोजक म्हणून गायक, कवी व संगीतकार मा. विष्णू शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
लोककलेच्या माध्यमातून समाजजागृतीचे सातत्यपूर्ण कार्य करणारे संगीतकार शिवराज साने यांच्या कार्याचा गौरव झाल्याने विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





