चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश
|
😊 कृपया इस न्यूज को शेयर करें😊
|
चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे निर्देश
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाची बैठक; पार्किंग, अतिक्रमण, वाहतूक व्यवस्थेसह पायाभूत सुविधांवर कालबद्ध उपाययोजना
पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी : चाकण औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, अवजड वाहनांचे पार्किंग, अतिक्रमणे, वीजपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर आता प्रशासनाने ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत विविध शासकीय यंत्रणांना स्पष्ट कालमर्यादा व जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या.
या बैठकीस आमदार बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह पीएमआरडीए, एमआयडीसी, एमएसआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, एमएसआरडीसी, नगर परिषद, जिल्हा परिषद, महसूल व पोलीस विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
३१ ऑगस्टपर्यंत रस्ते खड्डेमुक्त
चाकण औद्योगिक परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे आणि साइडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामात दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शुक्रवारपासून रस्त्यावरील पार्किंगला ‘नो एंट्री’
चाकण परिसरातील वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण असलेल्या रस्त्यावरील अवजड वाहनांच्या पार्किंगवर कठोर कारवाई केली जाणार आहे. एमआयडीसी परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागांचा पार्किंगसाठी नियोजनबद्ध वापर करण्यात येणार आहे.
शुक्रवारपासून रस्त्यावर वाहन पार्क करण्यास पूर्णतः प्रतिबंध राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीसह कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यासाठी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्यात येणार आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी १०० एमएसएफ जवान
चाकण औद्योगिक परिसराचा मोठा विस्तार लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थापनासाठी १०० महाराष्ट्र सुरक्षा दलाचे (MSF) जवान उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे जवान दोन पाळ्यांमध्ये कार्यरत राहणार आहेत.
रस्त्यावर अवजड वाहने बंद पडून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मोठ्या क्षमतेच्या क्रेनची व्यवस्था करण्यात येणार असून, बंद पडलेली वाहने तातडीने रस्त्याच्या बाजूला अथवा निर्धारित ठिकाणी हलविण्यात येणार आहेत.
अतिक्रमणांवर महिनाभरात कारवाई
चाकण औद्योगिक परिसरातील अनधिकृत टपऱ्या, चहाचे स्टॉल, गोदामे आणि अन्य अतिक्रमणांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधितांना नियमानुसार नोटीस देऊन २५ ऑगस्टपासून पुढील एक महिन्यात अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
अतिक्रमण हटवल्यानंतर त्या जागेचा रस्ता किंवा आवश्यक पायाभूत सुविधांसाठी वापर करण्याचेही नियोजन आहे. कोणतेही अतिक्रमण राजकीय अथवा अन्य दबावामुळे कारवाईतून वगळले जाणार नाही, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले.
एआयच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन
चाकण परिसरातील सुमारे ५०० किलोमीटर रस्त्यांचे सर्वंकष नियोजन करण्यात येणार असून, भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक वाहतूक सिम्युलेशनच्या माध्यमातून वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी केले जाणार आहे.
संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणून त्याचे व्यवस्थापन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून करण्याचे नियोजन आहे.
पादचारी सुरक्षेलाही प्राधान्य
रस्ते विकास करताना स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, पदपथ आणि योग्य ठिकाणी पादचारी क्रॉसिंगची सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. चाकण परिसरात मागील काळात झालेल्या अपघातांमध्ये जीवितहानी झाल्याने पादचारी सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत डिव्हायडर कट बंद करून वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
वीजपुरवठ्याचा प्रश्नही कालबद्ध पद्धतीने सोडविणार
औद्योगिक परिसरातील वारंवार होणारे ट्रिपिंग आणि लोडशेडिंग यावरही बैठकीत चर्चा झाली. आवश्यक ट्रान्सफॉर्मर व विद्युत यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास शासनाची मंजुरी मिळाली असून, संबंधित कामे ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे ३१ डिसेंबरनंतर औद्योगिक परिसरातील ट्रिपिंग व लोडशेडिंगची समस्या दूर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
विकासकामांपूर्वी वाहतूक आराखडा बंधनकारक
राष्ट्रीय महामार्ग, एमएसआयडीसी, रेल्वे आदी विविध यंत्रणांची आगामी विकासकामे सुरू होणार आहेत. ही कामे सुरू करण्यापूर्वी पर्यायी मार्ग, वाहतूक वळविण्याची व्यवस्था आणि वाहतूक सिम्युलेशनचा अभ्यास करणे आवश्यक राहणार आहे.
दरम्यान, नाशिक फाटा ते पुढील भागासाठी प्रस्तावित सुमारे २८ किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
पुढील काही दिवसांत परिणाम दिसणार – जिल्हाधिकारी डुडी
चाकण औद्योगिक परिसरातील समस्यांवर अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. संबंधित सर्व यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करून कालमर्यादेत कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे.
ठरविण्यात आलेल्या कालमर्यादेनुसार पुढील काही दिवसांत उपाययोजनांचे प्रत्यक्ष परिणाम दिसून येतील, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला. माध्यमांनीही या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून वस्तुनिष्ठ अभिप्राय द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
चाकणच्या वाहतूक कोंडीवर प्रशासनाचा ‘ॲक्शन प्लॅन’ आता प्रत्यक्षात उतरतोय; ३१ ऑगस्टची डेडलाइन आणि ‘झिरो टॉलरन्स’ धोरणामुळे औद्योगिक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
|
Whatsapp बटन दबा कर इस न्यूज को शेयर जरूर करें |
Advertising Space





